गाव ग्रंथालये व्हाया सरकारी शाळा

“कोणत्याही बालकाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही आणि त्याचे मन मारले जाईल अशा शाळेत त्यालाजावे लागणार नाही,”

अशा एका जगाचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण गावात१९७८ साली डॉ मॅक्सीन बर्नसन यांनी प्रगत शिक्षण संस्थेची सुरूवात केली. अगदी वंचितांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे आणि प्रत्येक मूल जन्मतः शिकण्याच्या ज्या नैसर्गिक प्रेरणा घेऊन येते त्या शिक्षणाच्या प्रक्रियेत मारल्या जाऊ नयेत अथवा त्यांना लगाम बसू नये ही संस्थेची मुख्य तत्त्वे.

देशभरात प्रयोगशील म्हणून ओळखली जाणारी कमला निंबकर बालभवन ही शाळा प्रगत शिक्षण संस्थेने सुरू केली. पण आपल्या स्वतःच्या एक-दोन शाळा सुरू करून आपले व्यापक स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही हे संस्थेने जाणले.हे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर मुख्य प्रवाहात असलेल्या शासनाच्या शाळांबरोबर काम करणे, त्यांच्या समस्या ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे हे गरजेचे आहे हे संस्थेने ओळखून यासाठी या शाळांबरोबरछोटेखानी प्रकल्प सुरू केले. कधी नगरपालिकेच्या शाळा तर कधी जिल्हा परिषद शाळांचा यात समावेश केला. मुख्यत्वे मराठी भाषा विविध आयामांतून कशी शिकवता येईल, मूल शाळेत कसे रमेल, आणि त्याचा शाळेतील वावर हा तणावमुक्त कसा करता येईल याचा विचार या लहान प्रकल्पांतून केला जात होता. मात्र विचार मोठ्या पातळीवर पोचावा यासाठी २०१४ मध्ये विशेष प्रयत्न सुरूकरण्यात आले.

ऑक्टोबर २०१५ मध्ये या प्रयत्नांना यश आले आणि फलटण तालुक्यातील १४५ जिल्हा परिषद शाळा आणिपाच आश्रमशाळांसोबत काम करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. USAID, Tata Trusts, Centre for MicroFinance यांनी आर्थिक भार उचललाआणि Nurturing Early Literacy in Primary Schools in Phaltan Block (NELPSPB) हा प्रकल्प अस्तित्वात आला.

शिक्षण यंत्रणेत शाळा जितकी महत्वाची आहे तितकेच पाठ्य पुस्तकाव्यतिरिक्त पुस्तकांचे महत्व आहे हे नाकारता येत नाही. म्हणून  या प्रकल्पात गाव ग्रंथालये उभी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. प्रकल्पाच्या प्रवासात अनेक ठिकाणी शासनमान्य गावग्रंथालये आहेत असे दिसत होते मात्र पुस्तके कायम बंद कपाटात होती. मग जर ही आपली ग्रंथालयाची संकल्पना पुढे न्यायची असेल तर सरकारी शाळांच्या माध्यमातून जावे, मग त्याची गरज पालक आणि गाव पातळीवर कळावी जेणे करून गाव ग्रंथालय म्हणून ही चळवळ पुढे भविष्यात उभी राहील असा विचार समोर आला.

पाठ्यपुस्तकांपेक्षा वेगळी पुस्तके का?

पाठ्यपुस्तकहे शिकवण्याचे एक साधन आहे परंतु पाठ्यपुस्तकांच्या अनेक मर्यादा असतात. एकच पाठ्यपुस्तक संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्याने प्रत्येक पाठाची सर्वच मुलांच्या अनुभव विश्वाशी जोडणी असेलच असे नाही. प्रत्येकपाठाची शब्द मर्यादा ठरलेली असल्याने अनेक वेळा मुलांना परिपूर्ण अनुभव आणि शिकण्याचा आनंद देण्यासाठी पाठ्यपुस्तके कमी पडतात.

गोष्टीच्या पुस्तकांमधील विचारांचा मुलांच्या अभिव्यक्तीवर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलून जातो. पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसूनपुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षाचे चित्र उभे करणारे साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला आणि आपल्या अभिव्यक्तीला मांडण्यास मदत करतात. मुलांच्या हातात अधिकाधिक चांगली त्यांच्या भावविश्वातील आशय असणारी पुस्तके जर पुरविली तर मुले जास्तीत जास्त पुस्तकाकडे ओढली जातात.

गोष्टींच्या पुस्तकामध्ये विविध विषयावरील लेखन आणि  आकर्षक चित्रे मुलांना पाहायला मिळतात त्यामुळे  मुलांच्या अनुभव कक्षा रुंदावतात. त्यासाठी मुलांनी पुस्तके वाचावीत, मुलांना पुस्तकांची गोडी लागावी यासाठी प्रकल्पामधून प्रशिक्षित केलेला त्याच गावातील  ग्रंथालय स्वयंसेवक पुस्तक देवघेवीबरोबर मुलांसोबत देखील वेगवेगळे उपक्रम घेत असतात. ग्रंथालयातील पुस्तकांकडे मुलांनी आकर्षित होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. गोष्ट  ऐकण्याबरोबरच चित्रामधून ती पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कारण ज्यांना अजून लिपी परिचय नाही, वाचता येत नाही अशा मुलांना  विविध चित्रे पाहण्यातून त्याबाबत  बोलण्यातून साक्षरतेला पूरक असे वातावरण निर्मिती करून मुलांना साक्षरतेकडे नेता येते. असे आमचे गाव-ग्रंथपाल सांगत असतात. एकूणच मुलांची समज चांगली करण्यासाठी बालसाहित्य मैलाचा दगड ठरत आहे असे म्हणता येत आहे.

“वाचणे म्हणजे इतर कोणी लिहिलेले शब्द वाचणे आणि लिहिणे म्हणजे स्वतःचे शब्द उतरवणे”

मुलांना गोष्टी ऐकण्यातून जो आनंद मिळतो तोच आनंद गोष्टी वाचतानाही मिळाला तर ती खऱ्या अर्थाने साक्षर झाली असे म्हणता येईल. मुलांबरोबर काम करतानाचा आमचा आजचा अनुभव इथे सांगायला हवा ज्यामधून आम्ही मुलांना पुस्तकाच्यादुनियेत घेऊन जाण्याचा आग्रह का धरतो हे समजेल. मुले अर्थ न समजता वाचतात तेव्हा आपल्याला काहीतरी नीट कळले नाही हेच त्यांच्या लक्षातच येत नसते. म्हणजे इथे फक्त तेओळखण्याचा/वाचण्याचा सराव करत असतात. त्यांना फक्त अक्षर वाचन करणे हेच समजलेले असते. आपण वाचतो ते अर्थ समजून घेण्यासाठीच ही बाब मुलांना अगदी सुरुवातीपासूनच लक्षात आणून देण्यातआपण कमी पडतो का? होय. अर्थासाठी वाचन ही बाब मुलांना सातत्याने लक्षात आणून देऊन पुढे जायचे असेल तर यासाठी बालसाहित्य म्हणजेच पुस्तकांशिवायपर्याय नाही. हेच ओळखून आम्ही १५० गावांत गाव-ग्रंथालये उभी करण्याचा निर्णय घेतला.

 

पुस्तकाचे एक गाव नव्हे तर १५० गावे उभी राहिली:  

Nurturing Early Literacy in Primary Schools in Phaltan Block NELPSPB प्रकल्पाच्या माधमातून १५० गाव-ग्रंथालयेउभारण्याची प्रक्रियासुरू झाली. प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात म्हणजे २०१५-२०१६ मध्ये ५० गाव ग्रंथालयांची सुरुवात केली गेली. मग पुढील दोन वर्षात ५०-५० गावात ही चळवळ पसरवली गेली.प्रकल्पातून सुरुवातीला एका एका ग्रंथालयासाठी लागणारे साहित्य म्हणजे रजिस्टर, कव्हर, कात्री, स्केचपेन, पेन्सिल, पुस्तके ठेवण्यासाठी मोठी पेटी इत्यादी साहित्य दिले गेले. प्रत्येक वर्षी काही प्रकल्पनिधी आणि काही अंशी लोक सहभाग घेऊन पुस्तके खरेदी केली जात.  गाव ग्रंथालयात  मुख्य सहभाग त्या-त्या गावातील जिल्हा परिषद शाळांचा घ्यायचा असे ठरले.

प्रकल्पाच्यापहिल्या वर्षात आम्ही जेव्हा गाव-ग्रंथालयाच्या माध्यमातून पहिली-दुसरीच्या मुलांना गोष्टींची पुस्तके देणार आहोत असा विषय जेव्हा एका जिल्हा परिषदेच्या शाळेत मांडला तेव्हा समोरून प्रश्न आला: की ज्या मुलांना अजून नीटशी अक्षर ओळखही नाही ती मुले पुस्तके काय वाचणार? म्हणजे मूल शाळेत जाऊन चांगले लिहिते-वाचते झाल्यावरच त्याच्या हातात बालसाहित्य द्यावे असा एक विचार दुर्देवाने समोर येत होता. खरे तर हा समज म्हणजे मुलांच्या लेखन-वाचन प्रवासाला पूर्णविराम आहे असे आपण म्हणू शकतो कारण आज आमच्या गेल्या तीन वर्षांच्या अनुभवातून असे ठामपणे मांडू शकतो की जी मुले अक्षर-ओळखीपासून कोसो दूर होती ती मुले पुस्तकांच्या साथीने लवकर आणि चांगल्याप्रकारेवाचायला लागली आणि मनातील भावबोलण्यातून आणि कागदावर उतरवू शकली.याचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीची अनेक पुस्तके त्यांचा सहभाग घेत वाचून दाखवण्यात आली. यातूनच मुलांची लेखी मजकुराची जाण हळू हळू वाढत गेली आणि मुलांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण होताना दिसत गेली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जे वाचू त्यावर कोणतीही परीक्षा नाही द्यायची हे मुलांना समजल्यावर ती कोणतेही दडपण न ठेवता वाचू लागली. वाचनाने भाषेच्या अनेक लकबी मुलांनी सहज आत्मसात केल्या हे नक्की. लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू एकदा का मुलांना येऊ लागली की ती वाचनाला अगदी चिकटून जातात असे दिसत होते आणि याच टप्प्यावर त्यांच्या हातात अधिकाधिक चांगली त्यांच्या भावविश्वातील विषय असणारी पुस्तके पडणे गरजेचे असते हे आम्ही जाणून पुढे जात राहिलो.

खरे तर चांगली आणि मुलांना आवडतील अशी पुस्तके शोधणे आणि ते पुरवणे हे विशेष आव्हान आमच्यासमोरही होते. एकतर आमचे वाचक म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थी. त्यांना शहरी पात्रे असणारी पुस्तके रुचण्याची शक्यता जरा कमी वाटत होती.पण एकूणच अजून चांगले बालसाहित्य मुलांना द्यावे ज्याचे विषय या ग्रामीण भागातील मुलांच्या अनुभवविश्वातील असतील हे कायम वाटत होते. त्यासाठी प्रकल्पात गोष्टींची पुस्तके तयार करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली होती. त्या दृष्टीने काम सुरू झाले.गेल्या तीन वर्षांत १२चांगली रीडर्स तयार झाली. सावलीतील शेळी आणि इतर कथा, गाबूशेटचा पंजा, कुंपणाच्या आत कोंबडा ओरडला, चला कुरड्या करू, निळ्याशार आकाशाखाली म्हशी, भुरा लांडगा, मासेमारीअसे मुलांच्या रोजच्या अनुभवातील विषय आणि भाषा हे मुलांच्या भावमनाला इतके स्पर्शून गेले की त्यातून नवीन गोष्टी आणि चित्रे आपसूकच मुलांकडून बाहेर आली.

या गाव-ग्रंथालयात शाळेतील मुले केवळ पुस्तके घेतात, वाचतात आणि ठेवतात असे होत नाही. प्रत्येक गावात आपला असणारा ग्रंथपाल मुलांना कधी पुस्तके वाचून दाखवतो तर कधी पुस्तकाबरोबर काही उपक्रम घेऊन पुस्तकाशी वेगळेच नाते जोडून देतो. मुले पुस्तके घरी घेऊन जातात. आपल्या आजोबांना, आई-बाबांना त्यांचे काम सुरू असताना भन्नाट गोष्टींची पुस्तके वाचून दाखवतात. मग कधी एखाद्या साक्षरता दिना सारखे औचित्य साधून मुले   पुस्तके घेऊन शेतावर काम करणाऱ्याकडे जातात, कधी मंदिरात बसलेल्या आजोबांकडे, तर कधी एक दोन वर्षांच्या बाळांकडेही. पुस्तके परत येतात ती आपल्या सोबत गावातील, अगदी गाव कुसातील आणि डोंगरावरीलही आपल्या पुस्तकमित्रांना घेऊन!मग ती आपल्या गाव-ग्रंथालयातआपला प्रवास नोंदवतात आणि पुन्हा निघतातएका आगळ्या वेगळ्या नव्या प्रवासाला.

जिथे ग्रंथपाल जाऊ शकत नाही तिथे गावातच तयार झालेले छोटे ग्रंथपाल जातात. वाड्या-वस्त्यांवर पुस्तके पोहोचतात. अशा आगळ्या-वेगळ्या गावग्रंथालयांमुळे मागील तीन वर्षांत एक नाही, दोन नाहीत तर तब्बल दीडशे पुस्तकांची गावे तयार झाली आहेत!

पहिल्या दीड वर्षात शाळेच्या कालावधीत मुलांपर्यंत पुस्तके पोचवणे आणि त्यांना वाचनाकडे नेणे हे ग्रंथपाल आणि शिक्षक यांच्या मदतीने शक्य होत गेले. पण हा सुरुवातीचा काळ जो ही संकल्पना उभारणीचा होता तो सोपा नक्कीच नव्हता. शाळांमधून असा विरोध होऊ लागला की शासनाने काही पुस्तके दिलेली आहेत मग हा आणखी पुस्तकांचा आणि आमच्यावर जबादारीचेओझे का? त्यावर शासनाने दिलेल्या मोठी आणि आत्मचारीत्र्य प्रकारातील पुस्तकांचा मुलांना उपयोग होतो का अशी चर्चा शिक्षकांबरे केली गेली. काही अंशी लोकसहभाग घेऊन पुस्तके वाढावी असा आमचा मानस होता. परंतु अगोदर पासून लोकसहभागाने त्रस्त झालेल्या पालकांना यासाठी तयार करणे फार कठीण होते. तेव्हा मग ग्रामपंचायत, शिक्षक पालक संघाचे चे प्रतिनिधी यांच्याकडून मदत घेत पुढे जावे लागले. पालक जेव्हा लोकसहभाग देऊ लागले तेव्हा मजकूर कमी आणि किंमत जास्त अशी पुस्तके का असा आणखी एक सवाल येऊ लागला. त्यावर ही पुस्तके अगदी पहिलीच्या मुलांना देखील वाचता यावे तसेच त्यातील विषय आणि चित्रे देखील किती महत्वाचे आहेत यावर प्रकल्प टीमने चांगले मार्गदर्शन करून हा विरोध बाजूला केला. जस जसे मुलांना पुस्तकांची आवड तयार होते केली तसे तसे त्यांचे वाचन वाढत गेले. मुलांच्या लेखनात आणि व्यक्त होण्यात शिक्षकांना चांगला बदल जाणवू लागला आणि मग कुठे तरी होणारा विरोध कमी झाला आणि गाव-ग्रंथालये स्थिर होण्याकडे वाटचाल करू लागली.

ग्रंथालायाच्या जागा:

हळू हळू असे दिसून आले की गोष्टींच्या पुस्तकांची जास्त आवश्यकता असते सुट्टीच्या वेळेस. उन्हाळी व दीपावलीच्या सुट्टीत वेळ जास्त असल्याने जास्तीत जास्त पुस्तके मुले वाचतील अशी आशा होती आणि मग सुट्टीमध्ये पुस्तके फिरू लागली, मुले आपल्याला हवे तिथे बसून मुक्तपणे वाचू लागली  आणि नवीनच ग्रंथालयाच्या जागा आम्हाला सापडत गेल्या  त्या  कधी झाडावर, बैलगाडीत, गोठ्यात बसून. शेतात, वाडी-वस्तीवरील मोकळ्या जागेत, पारावर आणि मित्र मैत्रिणींच्या घरामध्येही सापडत गेल्या. हे आता फक्त ग्रंथालय राहिले नाही ती वाचन चळवळ होऊन राहिली असे जाणवू लागले. घरात, शेतावर काम करणाऱ्या आपल्या पालकांना मुले पुस्तके वाचून दाखवू लागली. आपल्या गावात येणारे ऊस तोडणी कामगार, भटक्या जमातींची पाले आणि येथे असणारी मुले यांना गोष्टीची पुस्तके द्यावी,त आपण वाचून दाखवावीत अशी मुलांना आतून प्रेरणा मिळाली आणि मग पुस्तके तेथे गेली. आम्ही कधी कल्पना देखील केली नाही अशा ठिकाणी पुस्तके फिरू लागली.

सुट्टीमध्ये ज्या वाड्यावस्त्यांवर आपले ग्रंथपाल जाऊ शकत नाहीत तेथे त्याच वाडी वस्तीवरील छोटे ग्रंथपाल समोर आले. वयाने थोडी मोठी मुले ही या ग्रंथपालाची भूमिका घेऊ लागली. नियामीत त्या वाडी वस्तीवर जाणे,पुस्तकांची देवघेव करणे, कोणाला पुस्तक वाचून दाखवणे असा या छोटे ग्रंथपालपालांचा सुट्टीमधील कार्यक्रम. यानेच पुढे जाऊन पालकांमध्ये उत्सुकते पोटी गोष्टीची पुस्तके वाचनाची आवड निर्माण केली. मग पालकांना पुस्तके देवघेव कधी? मग ठरले असे की गावच्या आठवडी बाजारात पुस्तक प्रदर्शन लागेल आणि इथून पुस्तक देवघेव होईल. आणि ठरल्याप्रमाणे काम सुरु झाले. नकळत आता वाचनालय आठवडी बाजारात जाऊन पोचले.

हा पुस्तकानुभव या गावांतील पालक शिक्षक व मुले आमच्याकडेव्यक्त करीत असतात.शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातीलस्नेहभाव निर्माण करायला गोष्ट सांगण्यासारखीदुसरी जादूची बाब कोणतीच नाही. गोष्ट ऐकताना मुले शिस्तबद्ध आचरण शिकतअसतात, त्यातून त्यांना प्रेरणा मिळते, त्यांची कल्पकता वाढीस लागते. याबाबतदडसवस्तीचे शिक्षकसांगतात,

“वर्गात मुलांना शांत करणे, वर्गात नुसता गोंगाट न होऊ देणे हे एक आव्हान असते.

मी जेव्हा मुलांना शांत करायचे असते तेव्हा एक छोटे पुस्तक हातात घेऊन वाचायला

सुरुवात करतो. मुले आपोआप शांत बसू लागतात. तसेच जेव्हा वर्गात शिक्षक नसतात

तेव्हा एखाद्या मुलाला प्रकट वाचनासाठी पुस्तक देऊन वाचण्यास सांगितले तरशिक्षक नसतानादेखील मुलेचांगला प्रतिसाद देतात.”

(प्राथमिक शिक्षक, जिल्हापरिषद शाळा दडसवस्ती).

‘’मला गोष्टींची पुस्तकं जास्त आवडतात. त्या गोष्टींच्या पुस्तकातलं मला जास्त

आवडतात ती म्हणजे  चित्रं. ती चित्रं ज्या कुणी काढली असत्याल त्यो लयभारी चित्रकार

असल.” (इ. ३ री विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा राऊतवाडी).

“मुले सुरुवातीला पुस्तके मित्रांनी वाचली म्हणून घेत होती. ज्यावेळी मुलांना फळे,

प्राणी, पक्षी यांची पुस्तके वाचून दाखवली त्यामुळे त्यांना पुस्तकाविषयी अधिक गोडी

निर्माण झाली. आता मुले नदी बोलली त्या दिवशी, तीन गोष्टी, आपल्या भारतातील

साप ही मोठीपुस्तकेसुद्धा आवडीने वाचतात.”(ग्रंथपाल, विडणी)

“पुस्तकामुळे, गोष्टी वाचून दाखवल्यामुळे मुलांची शाळेतील हजेरी वाढली आहे.”

(प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, इरिगेशन बंगला)

“पुस्तकांबरे आम्ही प्रवास करीत असतो, प्रवासात आम्ही नव-नव्या ठिकाणी जातो,

नव-नव्या लोकांना भेटतो ते ही एका जागेवर बसून.” (विद्यार्थी, आश्रमशाळा, निंभोरे)

काही गाव-ग्रंथालयांतमुले आपल्या पालकांना गोष्टींची पुस्तके वाचून दाखवतात. कधीनऐकलेल्या भन्नाट गोष्टी ऐकून पुस्तक न कळत पालकांच्या हातात जातात. काहीठिकाणहूनपालक आम्हाला पण पुस्तके द्या अशी मागणी करत असतात.

“मुलांकडच्या रंगीबेरंगी चित्र आणि कधीच न वाचलेल्या गोष्टीच्या पुस्तकाला बघून

आम्हालापण पुस्तके मिळावी असे वाटत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत १० पुस्तके

वाचलीत.” (ग्रामस्थ, जावली).

आज आमचा या गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिध्द करू पाहतो आहे की एकदा का लेखीमजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली की तीवाचनाला/पुस्तकाला अगदी चिकटून जातात. आणि त्यांच्या हातात येणारी पुस्तके जर सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषय असणारी असतील तर मुले पुस्तकाकडे का नाहीत ओढली जाणार?

एखादी भाषा येणे म्हणजे नुसते त्या भाषेतील शब्द, वाक्य वाचता आणि लिहिता येणे इतके नक्कीच नाही. मुलांना मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली की मुले कल्पनेत रमतात. पूर्वानुभवांचे बोट धरून त्याही पुढे भराऱ्या मारू लागतात आणि मग ती व्यक्त करू लागतात त्यांच्याच दुनियेतील भन्नाट कल्पना ज्या आपल्यालाही आवाक करून टाकतात!

 

प्रकाश बापूराव अनभुले

प्रकल्प संचालक

NELPSPB, प्रगत शिक्षण संस्था, फलटण

anbhuleprakash@gmail.com

2 Comments

  • Vishal Kamble

    very nice sir. In past teacher use only texbook not other books for teaching, and they create artificial relation between students and textbook. Now by this project teacher know the values of library books.

Leave a Reply